ईडीची मोठी कारवाई, ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक
अमर मुलचंदानी यांना गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी अटक
पुणे : ईडी कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ईडीने अटक केली आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉयना अटक केली आहे. ईडीच्या प्रकरणांशी संबंधित गोपनिय कागदपत्र लीक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
पिंपरीतील सेवा विकास सहकारी बँकेचे संचालक अमर मुलचंदानी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. अमर मुलचंगानीचा ड्रायव्हर ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होता. या कर्मचाऱ्यांनी मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरला कागदपत्र दिली होती, असंही तापासात समोर आलं आहे. यानंतर ईडी कार्यालयातील दोन कर्मचारी आणि मुलचंदानी यांच्या चालकाला ईडीने अटक केली आहे.
याआधी गुरूवारी काँग्रेसच्या नांदेडमधल्या स्थानिक नेत्याला स्पीडपोस्टच्या माध्यमातून ईडीची नोटीस आली होती. काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना स्पीड पोस्टने ईडीची नोटीस मिळाली. या नोटीसनंतर शमीम अब्दुल्ला यांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयात फोन केला, तेव्हा मुंबई कार्यालयातून अशी कोणतीच नोटीस आली नसल्याचं आपल्याला सांगण्यात आल्याचा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केला.
या बनावट नोटीसबाबत शमीम अब्दुल्ला यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नांदेड महापालिकेच्या गुंठेवारी प्रकरणामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे. जानेवारी मध्ये ईडीच्या नागपूर पथकाने नांदेड पालिकेत येईन चौकशी देखील केली होती. बनावट गुंठेवारीच्या अनेक फाईल नागपूरच्या ईडी पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. याच संदर्भाद आज शमीम अब्दुल्ला यांना नोटिस आली. विशेष म्हणजे चौकशी ईडीच्या नागपूर पथकाकडे आणि नोटीस आली मुंबई कार्यालयातून, त्यामूळे संभ्रम निर्माण झाला. याप्रकरणी शमीम अब्दुल्ला यांनी तक्रार दाखल केली आहे.