Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘एमपीएससी’च्या सर्व पूर्व परीक्षा सीबीटी पद्धतीने

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांतील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगाने व्यापक सुधारणा सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अध्यक्ष भीमनवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर व परीक्षा नियंत्रक  सरिता बांदेकर – देशमुख उपस्थित होते.

अध्यक्ष भीमनवार म्हणाले की, यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा विलंब होत असल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध करण्यात आला असून, यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात तिची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आयोगाने निश्चित केले आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल. यामुळे उमेदवारांना निश्चितता मिळून त्यांच्या करिअरवरील अनिश्चितता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  ‘रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले की, सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’, किवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन ही नवी पद्धत नसून, लोकसेवा आयोगाने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणाली नुसार यशस्वीपणे घेतल्या आहेत. सीबीटी प्रणाली ही वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील विविध भरती संस्थांचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते. तसेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ने सुमारे १ कोटी उमेदवारांची भरती परीक्षा याच पद्धतीने यशस्वीपणे घेतली आहे. महाराष्ट्रातील स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (सीईटी) कडूनही अलीकडे १६.३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशनद्वारे घेण्यात आली. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही हीच पद्धत वापरली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button