‘अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला’; वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Akshay Shinde Encounter | बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. या चकमकीनंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला, तर विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, अक्षय शिदेंच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं?
या प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आले. आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेलं, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, मीडियासमोर आलो नाही. याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत, असं अक्षयच्या वडिलांनी म्हटलं.
हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा मृत्यु; पोलिसांनी केला ‘एन्काऊंटर’
अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत, असा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला आहे.
अक्षयचा मृत्यू कसा झाला?
अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.





