सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला कोणी? अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना देण्याच्या प्रकरणाने राजकीय वाद चिघळला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळ याच्या अर्जाला मंजुरी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, योगेश कदम यांनी शिफारस केली असली तरी पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी परवाना जारी केला नाही.
अजित पवार म्हणाले की, मी स्वतः पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांना सांगितलं की कोणीही, कुठल्याही पक्षाचा, गटाचा, कुठल्याही नेत्याच्या जवळचा असेल, त्याचे कुठल्याही मोठ्या व्यक्तीबरोबर फोटो असले तरी ते बघू नका. ज्याची चूक असेल, ज्याने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, नियम मोडले असतील त्याच्यावर कारवाई करा.
हेही वाचा : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर
सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यासंदर्भात काहींनी शिफारस केली असली तरी पोलीस आयुक्तांनी त्याला परवाना दिला नाही. स्वतः पोलीस आयुक्तांनीच ही गोष्ट मला सांगितली. मी त्यांना सांगितलं आहे की पुणे असो वा महाराष्ट्र, सगळीकडे कायदा व सुव्यवस्था राखणं ही सरकारची आणि तुम्हा पोलिसांची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले.
मी या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा विषय काढला. त्यावेळी मुख्यमत्र्यांनी सांगितलं की आपण ‘अजिबात कोणाची फिकीर करायची नाही.’ एकंदरीतच या प्रकरणी चौकशी करून दोषींवर पुढची कारवाई केली जाईल.
निलेश घायवळला पासपोर्ट कोणी दिला, त्याला मदत कोणी केली याबाबतही चौकशी करायला सांगतिलं आहे. तसेच सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यासंदर्भात शिफारस होती तरी पोलीस आयुक्तांनी त्याला परवाना दिला नाही, असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे, असंही अजित पवार म्हणाले.




