‘इंदापूरमध्ये सुरु होणार प्रगत मत्स्य महाविद्यालय’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि शाश्वत जलउत्पादन व्यवस्थापनासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात आवश्यक जमीन, बांधकाम आराखडा आणि निधी नियोजनाबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून, शासनस्तरावर निधी मंजुरीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना मंत्री भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यात स्थापन होणारे मत्स्य महाविद्यालय हे राज्यातील पहिले तंत्रज्ञानाधारित मत्स्य शिक्षण व संशोधन केंद्र असणार आहे. या महाविद्यालयात आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, जलसंसाधन व्यवस्थापन, मत्स्यजन्य उत्पादने प्रक्रिया, निर्यात गुणवत्ता प्रशिक्षण आणि जलचर जैवविविधता संवर्धन यांसारख्या विषयांवर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा – शेतकऱ्यांप्रमाणे आता रायगडच्या मच्छीमारांनाही ‘समूह विकास’चे कवच; केंद्र सरकारचा मोठा निर्णय…
या बैठकीला राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, सौर विभागाचे प्रधान सचिव भ. विजय, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील मत्स्य व्यवसाय, जलसंसाधन संवर्धन आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंदापूर तालुक्यातील जलसंपत्ती आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता हे महाविद्यालय मत्स्य व्यवसायातील शाश्वत विकासाचे केंद्र बनू शकते, असे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.




