अभिनेते, आंबेडकरी कार्यकर्ते विरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली – अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट चित्रपटाचे प्रमुख अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या वीरा यांनी त्यांचे आयुष्य संघर्षात घालविले. नागपूरला कामासाठी आलेल्या वीरा यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी जुळले. शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते. चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. मात्र अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणे त्यांना आवडायचे. त्यांच्या अचानक निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवल्याची शोक भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.





