१९ वर्षांखालील मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत ‘आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय’ संघाला विजेतेपद
!['Abeda Inamdar Junior College' team won the title in the under 19 girls' divisional cricket tournament](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Abeda-Inamdar-Junior-College-team-780x470.jpg)
पुणे : आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय संघाने (पुणे शहर) अहमदनगर ग्रामीण संघाला पराभूत करताना १९ वर्षांखालील मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
शिर्डी येथील मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय संघाने निर्धारित १० षटकांत १ बाद १०२ धावा तडकावल्या. यामध्ये संजीवनी पवारने आक्रमक फलंदाजी करताना ३३ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी केली. जाई शिंदेने संजीवनीला सुरेख साथ देताना २९ चेंडूत ३ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. लढतीतील शेवटच्या चेंडूवर जाई शिंदे धावबाद झाली. अहमदनगर ग्रामीण संघाला निर्धारित १० षटकांत ७ बाद ७६ धावाच करता आल्या. अहमदनगर संघाकडून अस्मिता अडगाने नाबाद २८ धावा (२ चौकार), अर्चना पाडावीने १५ (२ चौकार) धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. आबेदा इनामदार संघाकडून जाई शिंदेने २, संजीवनी पवार, श्रद्धा गिरमे व चाहत जैस्वाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय (पुणे शहर) संघाने पुणे ग्रामीण संघाला ९ गडी राखून पराभूत केले. पुणे ग्रामीण संघाने निर्धारित ८ षटकांत २ बाद ६२ धावा केल्या. पुणे ग्रामीण संघाकडून साक्षी खांडेने ३३ तर वृषाली रोकडेने १० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. आबेदा इनामदार संघाच्या स्वराली झुरुंगेने २ गडी बाद केले. आबेदा इनामदार संघाने ७.३ षटकांत १ बाद ६६ धावा करताना विजय साकारला. जाई शिंदेने १९ चेंडूत २७ (३ चौकार), संजीवनी पवारने १८ चेंडूत २५ (३ चौकार) तर श्रद्धा गिरमेने ८ चेंडूत ११ (२ चौकार) धावा करताना विजय साकारला.
उपांत्यपूर्व फेरीत आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय संघाने (पुणे शहर) पिपरी चिंचवड संघाला ५० धावांनी विजय मिळविताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. शहर संघाने निर्धारित ८ षटकांत २ बाद १०६ धावा केल्या. विजयासाठी आवश्यक असणारे आव्हान पिपरी चिंचवड संघाला पेलले नाही. पिंपरी चिंचवड संघाने निर्धारित ८ षटकांत ४ बाद ५६ धावा केल्या.
आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय संघाने या स्पर्धेत पुणे शहराचे नेतृत्व करताना विभागीय विजेतेपद मिळविले. यामुळे प्रथमच आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे शहराचे नेतृत्व करणार आहे.
संघाने मिळविलेल्या विजयासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामादर, स्कूल कमिटीचे चेअरमन ऍड. हनीफ शेख, कमिटी सदस्य हाजी कादिर कुरेशी, सिकंदर पटेल, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रोशनआरा शेख, उपप्राचार्य गफ्फार शेख क्रिडशिक्षक डॉ. गुलजार शेख यांनी सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करताना राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.