नगरमध्ये महिलेची रस्त्यावरच प्रसूती; रुग्णालायाकडून सारवासारव
![A woman giving birth on the street in the city; Treatment from the hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-29.jpeg)
अहमदनगर | प्रतिनिधी
अहमदनगर ग्रामीण रुग्णालयामध्ये कमल शिंदे ही महिला प्रसूतीसाठी गेली होती. मात्र रुग्णालयात तिला दाखल करून घ्यायला रुग्णालाय प्रशासनाने नकार दिला. या रुग्णालयाच्या हलगर्जीपणानंतर खासगी रुग्णालयात जात असताना या महिलेची रस्त्यात प्रसूती झाली. त्यानंतर रुग्णालयाने या प्रकारावरुन सारवासारव केली. आरपीआयचे सुरेंद्र थोरातांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या देत कामात हलगर्जीपणा करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलेच्या नातेवाईकांनी तिला दाखल करुन घेण्यासाठी अनेक विनवण्या केल्या. पण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांनी महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर नाईलाजास्तव या नातेवाईकांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र खासगी रुग्णालयात नेत असताना मध्येच रस्त्यात महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. यावेळी परिसरातील स्थानिक महिला कमल शिंदे यांच्या मदतीला धावून आल्या. स्थानिक महिलांनी रस्त्यावरच कमल शिंदेची प्रसूती केली. या प्रकरामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.