ताम्हिणी घाटात चालत्या कारवर दरड कोसळली; महिलेचा जागीच मृत्यू

Tamini Ghat Accident | रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. चालत्या कारवर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून त्या आपल्या कुटुंबासह पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या.
माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ ही घटना घडली. ताम्हिणी घाटातून जात असताना डोंगरावरून अचानक एक मोठा दगड खाली कोसळून त्यांच्या गाडीवर आदळला. दगड गाडीचा सनरूफ फोडून थेट स्नेहल गुजराती यांच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माणगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : महापालिका निवडणूक : महत्त्वाची अपडेट
दरम्यान, कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घाटांमध्ये लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात आंबेनळी घाट, भोर घाट वाहतुकीसाठी नियंत्रित ठेवले जातात. मात्र, तुलनेने सुरक्षित मानला जाणारा ताम्हिणी घाट आता या दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि घाटातील जोखमींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.




