जळगावात मिरचीच्या कारखान्याला भीषण आग, मिरची पावडर आणि मशिनरी जळून खाक
![A fire broke out at a pepper factory in Jalgaon, destroying chilli powder and machinery](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/A-fire-broke-out.png)
जळगाव | बोदवड शहरातील मलकापूर रोडलगत असलेल्या खाडेलवाल पेट्रोल पंपामागील देवराम माळी त्यांच्या मालकीच्या मिरची कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे २३ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत कारखान्यातील मिरची पावडर आणि मशिनरी जाळून खाक झाले असून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर येथून अग्निशमक बंब पाचारण करण्यात आले होते. अग्नीशमन बंब येत नाही तोपर्यंत नागरिकांनी टँकर आणि मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळाल्यावर बोदवड पोलिसांनी घटनस्थळी भेट दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शहरामध्ये अग्निशामक दलाची कुठल्याही प्रकारची सेवा नाही…
शहरामध्ये अग्निशामक दलाची कुठल्याही प्रकारची सेवा नसल्यामुळे जामनेर येथून अग्निशामक बंब येईपर्यंत मिरची कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला. बोदवड शहरात अग्निशामक दलाची कुठल्याही प्रकारची सुविधा अस्तित्वात नाही त्यामुळे बोदवड शहरामध्ये अचानक आग लागली तरी शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या जामनेर येथून अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात येतात. या भीषण नुकसानीत नेमके किती नुकसान झाले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.