धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून ७५ वृध्दाला आगीवरून चालवले, नऊ जणांविरुद्ध गुन्हा
![75 old men were burned at the stake on suspicion of witchcraft](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Thane-780x470.jpg)
ठाणे | जादूटोणा आणि करणी करण्याच्या संशयावरून मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील एका ७५ वर्षांच्या व्यक्तीला जबरदस्तीने आगीवर नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण भावार्थे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून ते या प्रकारात जखमी झाले आहेत. त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, रविवारी करवळे गावामध्ये भावार्थे घराण्याच्या कुलदैवताचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी लक्ष्मण भावार्थे हे आजारी असल्याने कुलदैवताच्या गोंधळाच्या कार्यक्रमाला न जाता घरीच आराम करत होते. रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे त्यांचा दरवाजावर लाथा मारुन दरवाजा उघडायला लावला. त्यावेळी आठ दहा गावकऱ्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना उद्देशून ”तू गावामध्ये जादूटोणा करणी करतो, तू गोंधळाच्या ठिकाणी चल, तुला कुलदैवतासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागेल, तू आला नाहीस तर तुला उचलून नेऊ” असे बोलून गावातील काठोड महादू भावार्थे, ज्ञानेश्वर काथोड भावार्थे, काळुराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसु भावार्थे व इतर तीन चार लोकांनी लक्ष्मण भावार्थे यांना अंथरुणावरून उचलून नेऊन गोंधळाच्या ठिकाणी जळत्या निखाऱ्यावर उभे केले आणि म्हणाले की, “चल तू तुझा देव अंगात आणून दाखव, तू भुताटकी करतो हे कबूल कर” असे म्हणून त्यांना तीन चार लोकांनी जबरदस्तीने पकडून ठेवून जळत्या निखाऱ्यावर उभे केले.
हेही वाचा – महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त
यावेळी त्यांच्या पाठीवर हातावर पायावर लाथा मारून ‘तुझ्या अंगात भुताटकी येते तू पेटत्या इंगळावर चालून दाखव’ असे म्हणून आसनगाव वरून आलेल्या मांत्रिकाने गोंधळाच्या ठिकाणी जळते निखारे आणून टाकले आणि त्यावर लक्ष्मण भावार्थे यांना जबरदस्तीने उभे केले. ते वेदनेने ओरडत असताना ही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना तीन-चार लोकांनी पकडून ठेवल्यामुळे त्यांना विस्तवावरून बाजूला होता येईना. यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना जबरी जखमा झाल्या आहेत.