38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25
'सुपर मॉम' ऋतिकाची सुवर्णभरारी कायम

ईशा वाघमोडेला कांस्यपदक
हल्दवानी : डायव्हिंग मधील ‘सुपर मॉम’ म्हणून ख्याती मिळवलेल्या सोलापूरच्या ऋतिका श्रीराम हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकांची मालिका कायम ठेवली. तिने ४ मीटर स्प्रिंग बोर्ड या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर सोलापूरच्या ईशा वाघमोडे हिने कांस्यपदकाची कमाई केली.
मूळची सोलापूरच्या असलेल्या ऋतिका हिने डायव्हिंग मधील सर्वोत्तम कौशल्याचा प्रत्यय येथे घडविला. तिने 164.75 गुणांची कमाई केली. या क्रीडा प्रकारात सोलापूरच्या ईशा वाघमोडे हिने कांस्यपदक पटकाविले तिने १५३.०४ गुणांची नोंद केली. येथे तिने याआधी प्लॅटफॉर्म डायव्हिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले होते
साडेतीन-चार वर्षाचा मुलगा असूनही ३४ वर्षीय खेळाडू ऋतिका हिने डायव्हिंग यासारख्या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात आपले यशस्वी करिअर कायम ठेवले आहे. एकूण ६ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे ११वे सुवर्णपदक होय. त्याखेरीज तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
हेही वाचा – पुणे-लोणावळा चौपदीकरण रेल्वे मार्गासाठी प्रसंगी न्यायालयात जनहित याचिका!
मुंबई पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या ऋतिका हिने आजपर्यंत वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक पदके जिंकली असून त्यामध्ये तीन डझन पेक्षा जास्त सुवर्णपदकांचा समावेश आहे त्याखेरीज तिने कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत पन्नासहून अधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत. तसेच तिने सन २००९ मध्ये आशियाई वयोगट स्पर्धेत एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले होते. तिचे पती हरिप्रसाद हे देखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत.
सोनेरी यशाची खात्री होती- ऋतिका
स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग हा माझा अतिशय आवडता क्रीडा प्रकार असल्यामुळे मला येथेही सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता. सुदैवाने येथे माझ्या अपेक्षा नुसारच माझी कामगिरी झाली असे ऋतिका हिने सांगितले. ती पुढे म्हणाली माझ्या या कामगिरीचे श्रेय माझ्या कुटुंबाला द्यावे लागेल तसेच पश्चिम रेल्वेकडून मला सातत्याने सवलत व सुविधा मिळतात त्यामुळेच माझे हे करिअर घडले आहे.