Pune | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त
![3 lakh 80 thousand rupees seized in Kasba Peth assembly constituency](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Pune-2-1-780x470.jpg)
पुणे | पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
हेही वाचा – महायुती, मविआत ‘या’ जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?
उमेदवारांकडून निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाच्या नोंदी कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले होते. निवडणूक आयोगाकडून खर्च संनियत्रणावरील लेख्यांची तपासणी केली जाते. यात प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी केलेल्या दैनंदिन खर्चविषयक लेख्यांची तपासणी करण्यात येते.
पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असतील तर महायुतीची पुण्यात २५ तारखेला नदीपात्रात सभा देखील होणार आहे. तर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.