लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची माहिती

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. यानंतर विरोधकांकडून अनेकदा ही योजना बंद होणार असल्याचे दावे करण्यात आले. त्यानंतर सरकारकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले होते.
मात्र, या योजनेचा लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली जात आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आणि अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली. जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणारी महिला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असावी. दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर अर्ज अपात्र ठरेल. अशा विविध कारणांमुळे 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत,’ असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
‘या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल.’
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशीही माहिती आदिती तटकरे यांनी दिली.




