17 फेब्रुवारीला शालेय शिष्यवृत्ती परीक्षा होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/student-22.jpg)
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या 17 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती आणि अंतिम वेळापत्रक लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.
राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. गेल्या परीक्षेपासून परिषदेने परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरिअल प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला. परिषदेने गुरुवारी शिष्यवृत्तीच्या परीक्षेबाबत एक पत्रक प्रकाशित केले असून त्यामध्ये परीक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या पत्रकानुसार त्यांना संकलन प्रपत्र परिषदेच्या वेबसाइटवर असलेल्या लिंकवर 9 ऑक्टोबरपर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रकामध्ये परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 17 फेब्रुवारी रोजी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या परीक्षेची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.