सहकार क्षेत्रात १७ लाख रोजगार… केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : ‘देशाचे कृषी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. सहकारातून उद्योग, व्यवसाय उभे राहत आहेत. देशात सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्था आहेत. त्यांच्याशी ३० कोटींपेक्षा अधिक नागरिक थेट जोडलेले आहेत. भविष्यात सहकार क्षेत्र अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी किमान १७ लाख प्रशिक्षित युवकांची गरज भासणार आहे,’ असा दावा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी केला.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) संस्थेच्या २०२३ ते २०२५ कालावधीतील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन पदविकेच्या ३१ व्या तुकडीचा पदवीदान समारंभ मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या संचालक आणि राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेच्या सचिव मिनू शुक्ला पाठक उपस्थित होत्या.
मोहोळ म्हणाले,‘देशात सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्था असून, त्यांच्याशी ३० कोटींपेक्षा अधिक नागरिक थेट जोडलेले आहेत. हे लक्षात घेऊन ग्रामीण अर्थकारणाला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प केला. सहकारासाठी नवीन मंत्रालयाची निर्मिती केली. राजकारण, समाजकारणाची सुरुवात सहकार चळवळीतून करणाऱ्या अमित शहा हे देशाचे पहिले सहकार मंत्री झाले.’
हेही वाचा – ‘भारताला महाशक्ती नव्हे, विश्वगुरु व्हायचे आहे’; सरसंघचालक मोहन भागवत
‘पंतप्रधानांनी ‘सहकारतून समृद्धी’चा कानमंत्र दिला आहे. आता सहकार क्षेत्रात क्रांतीकारी बदल होत आहेत. कृषी व्यवसाय नव्या रूपात येत आहेत. सहकारी समित्यांचे जाळे अधिक सशक्त होत आहे. आगामी काळात सहकारासाठी किमान १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज लागणार आहे,’ असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
‘देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे. आता लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहोत. हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे अत्यावश्यक आहे. जेव्हा देशात सहकार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत असताना आत्ताचे विद्यार्थी पदवीधर होत आहेत. केवळ व्यवस्थापनात पदवीधर नाहीत, तर भारताच्या सहकार चळवळीचे भविष्यातील नेतृत्व करणार आहात. देशात कुठेही काम करत असलात, तरी सहकारातून समृद्धीची भावना जपा आणि सहकार चळवळीचे मूल्य टिकवून ठेवा,’ असा सल्लाही मोहोळ यांनी विद्यार्थ्यांना दिला. विश्वास हेच सहकार चळवळीचे मूळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.




