breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

साहेबांवरील निष्ठा : ‘विठोबा’च्या देव्हाऱ्यातील शरद पवार…अन्‌ अपूर्ण इच्छा!

पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते विलास लांडे कुटुंबियांचे सांत्वन

आयुष्याच्या शेवटपर्यंत देवस्थानी मानणाऱ्या लोकांचे प्रेम पाहूण शरद पवारही भावूक

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

शरद पवार…गेली ५० वर्षे महाराष्ट्रातील जनमानसांच्या मनावर अधिराज्य करणारे अनाकलनीय नेतृत्व… भारतीय राजकारणात एखाद्या नेत्याला देवसमान किंवा पितृतुल्य मानणे नवीन नाही. पण, अलिकडच्या काळात कट्टर कार्यकर्ता, निष्ठावंत या संकल्पना बोथट झाल्या आहेत. महाराष्ट्रात शरद पवार त्याला अपवाद आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ५० वर्षे पाय रोहून उभे ठाकलेले एकमेव नेतृत्व या घडीला आहे ते म्हणजे शरद पवार…राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांचा हातखंडा काय? तर कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीचे कौटुंबिक  संबंध..जपणे आणि टिकवून ठेवणे. त्यामुळेच शरद पवार यांना अनेकांच्या देव्हाऱ्यात स्थान आहे. याची प्रचिती आली ती पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांच्या निवासस्थानी…

भोसरीचे माजी आमदार असलेल्या विलास लांडे यांना नुकताच पितृशोक झाला. तत्पूर्वी महिनाभर अगोदर त्यांच्या मातोश्रींचे देहावसन झाले. त्यावेळी शरद पवार यांनी लांडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यांची विचारपूस केली आणि सांत्वनही केले. त्यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढताना भोसरीत आल्यावर तुमचे वडिल आणि सहकारी घराच्या ओट्यावर बसलेले असायचे…मला आठवते…तुमच्या वडिलांचे वय काय…? मला त्यांना एकदा भेटायला घेवून जा…असा संवाद झाला होता. सोशल मीडियावर हा संवाद व्हायरलही झाला होता.

       त्यावेळी माझे वडील वयाने १०२ वर्षांचे आहेत…वारकरी आहेत…त्यांच्या देव्हाऱ्यात विठोबा जसा आहे…तसाच तुमचा फोटोही आहे…असे भावूक उद्गार विलास लांडे यांनी शरद पवारांशी बोलताना काढले. या संवादाला जेमतेम एक महिनाही झाला नाही… तोपर्यंत लांडे कुटुंबियांवर दुसरा आघात झाला… लांडे यांचे वडील विठोबा लांडे यांचे देहावसन झाले. शरद पवारांची इच्छा अपूर्ण राहीली.

       आई-वडिलांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी भोसरीत दौरा काढला. विलास लांडे कुटुंबियांसोबत माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ता साने यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले. पण, शरद पवार यांनी लांडे यांच्या निवासस्थानी असलेल्या  देवाऱ्याचे दर्शन घेतले.

शरद पवार भावूक झाले…

शरद पवार यांनी विलास लांडे यांच्या निवासस्थानी असलेल्या देव्हाऱ्याला भेट दिली. त्यावेळी पवार भावूक झाले. देव्हाऱ्यात श्री. विठ्ठल रुक्मिणीसह संत तुकाराम महाराज यांची मूर्ती… यांच्या सर्व अन्य देवतांची मूर्ती सोबत शरद पवार यांची प्रतिमा…होय देव्हाऱ्यात शरद पवारांच्या प्रतिमेचे पूजन रोज करणारे वारकरी विठोबा लांडे…त्यांनी अखेरपर्यंत पवार यांच्यावरील निष्ठा आणि श्रद्धा कमी होवू दिली नाही. पवार यांच्यासोबतच जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या प्रतिमा. भागवत धर्माशी संबंधित ग्रंथ पाहून शरद पवारांसह उपस्थित असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आवाक झाले. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्यावर अपार श्रद्धा ठेवावी…त्यांना भेटण्याची इच्छा असतानाही ती अपूर्ण रहावी…अशी हुरहूर मनाला लागल्याने पवारही काहीवेळी नि:शब्द झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button