साताऱ्यात महाराज विरुद्ध महामहिम अशी रंगणार लढत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/udayan-raje-1.jpg)
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. त्यामुळे महाराज विरुद्ध महामहिम अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार असून गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल याचे तर्क-वितर्क लढवले जात होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने, नितीन पाटील यांच्या नावांची चर्चादेखील सुरू होती. पण सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. मात्र सर्वसमावेशक आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होणारे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते.