कोलकत्त्याच्या भाजप कार्यालयाजवळ ५१ क्रूड बॉम्ब सापडल्याने खळबळ
कोलकत्ता– कोलकत्यातील भाजप कार्यालयाजवळ शनिवारी रात्री ८ च्या सुमारास तब्बल ५१ क्रूड बॉम्ब सापडले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. हे बॉम्ब भाजप कार्यालयात जवळच्या हेस्टिंग्स क्रॉसिंग परिसरात सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कोलकात्यातील भाजप कार्यालयाजवळ बॉम्ब असल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार कोलकत्ता पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली. तेव्हा या कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या हेस्टिंग्स क्रॉसिंग परिसरात ठेवलेल्या टोपली ५१ बॉम्ब सापडले. त्यानंतर बॉम्ब स्फोट विरोधी पथकाने ते निकामी केल्यामुळे घातपाताचा मोठा डाव उधळला गेला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.




