शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली- संजय राऊत
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबईत येणार आहेत. या भेटीदरम्यान ते मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर अमित शहांना मातोश्रीवर यावसं वाटतंय, अशी बोचरी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
”केंद्रामध्ये सत्तेत येऊन ४ वर्ष झाली तोपर्यंत शहा यांना मातोश्रीवर यावंस वाटलं नाही, पण आता भाजपाचे सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून चाललेत, देशातील राजकारण बदलतंय, भाजपविरोधात जनतेमध्ये राग वाढतोय. त्यातच पालघरमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून दाखवली. आमचा निसटता पराभव झाला असेल. पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दाखवल्याने अनेकांना धडकी भरली आहे, आणि त्यामुळेच आता चार वर्षांनी अमित शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतंय”, असं संजय राऊत म्हणाले.





