breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शिक्षकांकडूनच इंटिग्रेटेड कोर्सेसचा “बाजार’

  • नातेवाईकांच्या नावे कोचिंग क्‍लास उघडून घेतली जाते शिकवणी 
    – कोचिंग क्‍लास कायदा अडकला “लाल फितीत’

पुणे- एकीकडे शासनाकडून दीड दीड लाख रुपये पगार घ्यायचा तर दुसरीकडे स्वत:च्या किंवा घरातील व्यक्‍तींच्या नावे कोचिंग क्‍लास उघडून इंटिग्रेटेड कोर्सेस चालवायचे असा प्रकार गेल्या काही वर्षांपासून पुण्यात सर्रास सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कोचिंग क्‍लास कायदा यावर काही प्रमाणात वचक आणेल असे वाटले होते परंतु कायदा अजुनही लाल फितीच्या कारभारातच अडकलेला दिसत आहे.
स्पर्धा परीक्षांचे हब म्हणून पुण्याची ओळख झाली आहेच; मात्र आता प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणारे इंटिग्रेटेड महाविद्यालयांचे पुणे अशीही ओळख होताना दिसत आहे. विज्ञान शाखेतून आयआयटी, जेईई, सीईटी, नीट सारख्या प्रवेश परीक्षा तर वाणिज्य शाखेतून सीएच्या सीपीटी, सीएसची परीक्षा आदींची तयारी विद्यार्थी करतात. या सर्व परीक्षा बारावी झाल्यानंतर घेतल्या जातात. मात्र यांची तयारी ही अकरावीपासूनच विद्यार्थी करताना दिसतात. ही तयारी त्यांच्याकडून कोचिंग क्‍लासेस करून घेतात. मात्र यातील बरेचसे कोचिंग क्‍लासेस हे महाविद्यालयामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नातेवाईकांच्या नावे ते प्राध्यापक स्वत: चालवितात. वास्तविक पाहता प्राध्यापकांना व शिक्षकांना कोचिंग क्‍लासमध्ये शिकवण्यावर बंदी आहे. मात्र याबाबत कोणी तक्रार करत नाही म्हणून शिक्षण विभागही याकडे कानाडोळा करताना दिसतो.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात अनेक नामांकित महाविद्यालये आहेत जी या इंटिग्रेटेड प्रकारणात आहेत; तर अशी अनेक सी ग्रेड महाविद्यालये देखील आहेत जी बंद पडू नयेत म्हणून त्यांनी कोचिंग क्‍लासेसशी टाय-अप करून विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश करून दिले आहेत. हा सर्व प्रकार शासनाचा पैसा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा ऱ्हास करणारा आहे. यावर कोचिंग क्‍लास विषयक कायद्याने थोड्याफार प्रमाणात वचक आणणे शक्‍य आहे. मात्र कोचिंग क्‍लास कायद्याचा मसुदा शासनाकडे पाठविला असून अद्यापही त्यावर कायदा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या वर्षात शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांची लुट कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत कोचिंग क्‍लासचा कायदा शासकीय पातळीवर कोणत्या टप्प्यावर आहे याची विचारणा करण्यासाठी राज्याच्या माध्यमिक विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

प्रवेशाचा प्रकार एक 
आयआयटी, जेईई, सीईटी, नीट या परीक्षांची तयारी आमच्याकडे करून घेतली जाते अशी माहिती शाळांकडूनच घेऊन निकाल जाहीर होण्याआधीच पालकांना एसएमएसद्वारे द्यायची. त्यानुसार पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून दहावीचा निकाल लागण्याआधीच विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यायचे. यासाठी विद्यार्थ्यांकडून अकरावीसाठी एखाद्या “सी ग्रेड’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन द्यायचा. त्यानंतर पूर्ण वेळ क्‍लासेस घेऊन विद्यार्थ्यांना तयार करायचे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण व हजेरी आर्थिक व्यवहार करून मॅनेज करायची.

प्रवेशाचा दुसरा प्रकार
अकरावीचे प्रवेश हे केवळ पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांत ऑनलाईन पध्दतीनेच होतात. त्यामुळेच पुण्याबाहेरच्या एखाद्या महाविद्यालयात ऑफलाईन प्रवेश घ्यायचा. त्यासाठी खोटा भाडेकरार करून विद्यार्थी तेथेच राहात असल्याचे दाखवायचे. विद्यार्थ्यांना त्यांचे सर्व प्रात्यक्षिकांचे गुण पैकीच्या पैकी दिले जातात. तसेच त्यांची हजेरी 75 टक्‍क्‍यांच्या वर भरून घेतली जाते. यासाठी काही आर्थिक व्यवहार केले जातात. त्यानुसार विद्यार्थी केवळ कागदोपत्री ग्रामीण भागातील त्या महाविद्यालयात प्रवेशित दाखविला जातो. प्रत्यक्षात विद्यार्थी एखाद्या क्‍लासमध्ये बसून प्रवेश परीक्षांची तयारी करत असतो.

प्रवेशाचा तिसरा प्रकार
ग्रामीण भागांत अनेक कोचिंग क्‍लासेसला स्वत:ची जागा नसल्याने संस्थाचालकांशी टाय-अप करून कोचिंक क्‍लासवाले थेट महाविद्यालयांमध्येच येऊन शिकवतात. हा प्रकार ग्रामीण भागात तसेच पुण्याच्या उपनगरांमध्ये चालताना दिसतो. यामध्ये बहुतांशी शिक्षकांचेच कोचिंग क्‍लास असतात व त्याचे वर्ग हे त्या संबंधित महाविद्यालयांमध्येच भरतात. काही शिक्षक ऑफ तासाला कोचिंग क्‍लासेसच्या विद्यार्थ्यांना शिकवतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button