विलंबाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/congress-ncp.jpg)
मुंबई:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरीही सरकार स्थापण्यासाठी अद्याप कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. भाजप-शिवसेना युतीला जनतेने कौल दिला असतानाही सरकार स्थापन होत नसल्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीवर टीका केली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात २००९ मध्येही सरकार स्थापण्यास असाच विलंब लागला होता.
सत्ता स्थापण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना युतीवर टीका केली. ‘जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला. यानुसार सरकार स्थापण्याची प्रक्रिया लगेचच सुरू करणे अपेक्षित होते. पण खुच्र्याच्या खेळात सरकार स्थापन करणे युतीला शक्य झालेले नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशा वेळी सरकारने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते. सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली. पण ही मदतही अपुरीच आहे. सरकार स्थापन होण्यास विलंब लागत असल्याबद्दल राज्यपालांनीच आता पुढाकार घ्यावा, अशी भूमिकाही पाटील यांनी मांडली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही युतीला चिमटे काढले. जनतेचा कौल युतीच्या नेत्यांना मान्य नसावा असाच अर्थ निघतो, अशी टीका थोरात यांनी केली.