राधाकृष्ण विखे-पाटील यांची पत्नी, नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली
![BJP leader Radhakrishna Vikhe Patil gave corona positive information on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/vikhe-patil-1-1.jpg)
शिर्डी – भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी आणि दोन्ही नातवंडे बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून थोडक्यात बचावली. अहमदनगरमध्ये ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली, मात्र समोर कुत्रा आल्याने विखे-पाटील कुटुंब बचावले.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील ऊसाच्या शेतात नातवंडांसोबत बसल्या होत्या. पुत्र आणि भाजपाचे खासदार सुजय विखे यांची सहा वर्षाची मुलगी अनिशा, तसेच कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षाचा मुलगा जयवर्धन हे शालिनी विखेंसह होते.
शालिनी विखे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत होत्या. इतक्यात ऊसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. बिबट्याला पाहून शालिनी विखे यांच्या काळजात धस्स झाले. सुदैवाने तिघांपासून अवघ्या पाच फुटांवर असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले आणि बिबट्या पुन्हा आल्या पावली ऊसात दिसेनासाही झाला.