राष्ट्रवादी शरद पवार गटात ‘‘लेटर बॉम्ब’’ : चिंचवडमधील संभाव्य आयारामांविरोधात असंतोष!
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना मागणीचे पत्र : संधीसाधुंना नको, तुषार कामठे यांना उमेदवारी द्या
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात ‘आयाराम’ इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून आयारामांविरोधात असंतोष असून, केवळ उमेदवारीसाठी येणाऱ्यांना पक्षात घेवू नका, चिंचवडमधून शहराध्यक्ष तुषार कामठे यांना उमेदवारी द्या, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफ शेख यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहीले आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शहराध्यक्ष तुषार कामठे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षातून इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताप शेख यांनी लिहिलेले पत्र…
प्रति,
मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
विषय : नव्याने पक्षात येऊन उमेदवारी मागणाऱ्यांऐवजी अडचणीच्या काळात एकनिष्ठ राहिलेल्या शहराध्यक्ष तुषार कामठे यांना उमेदवारी देण्याबाबत..!
आदरणीय साहेब,
सप्रेम नमस्कार,
उपरोक्त विषयान्वये आम्ही आपणांस नम्र विनंती करतो की, आपल्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात नव्याने पक्षसंघटना उभारणीसाठी शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात पक्षातील सर्वच्या सर्व नेते व पदाधिकारी दुसऱ्या बाजूला गेले असताना केवळ तुमच्या खंबीर नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तुषार कामठे यांनी शहरात काम सुरू केले. विरोधक आम्हाला औषधालाही न उरलेला पक्ष, संपलेला पक्ष अशा वल्गना करून हिनवत असताना तुषार कामठे ठामपणे आम्हा कार्यकर्त्यांसह आपल्या पक्षाचे पुरोगामी विचार, ध्येय, धोरणे पक्षचिन्ह जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी दिवसरात्र एक करत होते, खंबीरपणे पक्षासोबत राहण्याचा संकल्प करून नवनवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करत होते.
परंतु लोकसभा निवडणुकीनंतर आपली पक्षाला महाराष्ट्रभरातील जनतेने दिलेले प्रचंड प्रेम पाहता आता पक्षाला चांगले दिवस येतायत हे पाहून आयत्या संधीचा शोधात असणारे आणि गेली वर्षभर आमच्यावर, आपल्या पक्षावर, तुमच्यावर सातत्याने टीका करणारेही आपल्या पक्षात येण्यासाठी रांग लावायला लागले आहेत, पण साहेब, आमची आपणास कळकळीची विनंती आहे की, केवळ उमेदवारीच्या लालसेपोटी पक्षात येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांऐवजी निष्ठावंत सुयोग्य कार्यकर्ता म्हणून आपल्या पक्षाच्या वतीने चिंचवड विधासाभ मतदारसंघासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे यांना संधी द्यावी, ही नम्र विनंती.
आज जे आपल्या पक्षात प्रवेश करून विधानसभेची उमेदवारी मागत आहेत, त्यांचा इतिहास पहिला तर ते विविध पक्ष फिरून आता आपल्या पक्षात येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना 2023 च्या चिंचवड पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असतानाही स्वतःची अनामत रक्कम ही वाचवता आली नाही, त्यामुळे अशा निवडून न येणाऱ्या आणि पक्षाशी वैचारिक बांधिलकी नसणाऱ्यांना उमेदवारी न देता अडचणीच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष बळकट करण्यात पुढाकार घेणाऱ्या तुषार कामठे यांना उमेदवारी देण्यात यावी, कारण नव्याने आलेल्यांना उमेदवारी देऊन जर त्या उमेदवाराचा पराभव झाला तर पक्षाच्या दृष्टीने तसेच शहर संघटनेतील सर्वच कार्यकर्त्यांसाठी अन्यायकारक ठरेल, तरी आमच्या विनम्र विनंतीचा स्वीकार करावा.
धन्यवाद..
आपले विनीत
अल्ताफ शेख (अध्यक्ष : अल्पसंख्यांक विभाग)







