राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी, मराठा आरक्षणावरून शिवेंद्रराजे भोसले यांचा घणाघात
सातारा –“राज्य सरकारच्या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे मराठा समाजाला सध्यातरी आरक्षण मिळेल, असं वाटत नाही. राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी”, अशी रोखठोक प्रतिक्रिया भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. यावेळी त्यांनी वाढीव वीजबील आणि महावितरणाचा वीज कनेक्शन कापण्याबाबत दिलेल्या आदेशावरुन सरकारवर सडकून टीका केली.
वाचा ;-मराठा आरक्षणावर ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
मराठा आरक्षणावर 25 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात याबाबत अजूनही दावे-प्रतिदावे सुरु आहेत. याबाबत अद्यापही ठोस निकाल देण्यात आला नसल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.महावितरण विभागाने वीज थकीत बिलाबाबत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील राज्य सरकारला याबाबत तीव्र इशारा दिला आहे.
“विजवितरण मंडळाने घेतलेला निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून त्याबाबत फेरविचार करण्यापेक्षा तो रद्द करावा. राज्य सरकारने खरंतर वीज ग्राहकांना सवलती देण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. घरगुती किंवा शेती पंपाचे वीजबिल असतील, अव्वाच्या सव्वा बिलांबाबत लोकांच्या मनात तीव्र नाराजी आहे”, असं शिवेंद्रराजे म्हणाले.“मधल्या काळात ऊर्जा मंत्र्यांनी नागरिकांना याबाबत सवलती देऊ, फेर विचार करू असे सांगितले होते. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर या पुढील काळात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करु”, असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला.





