राज्यात रक्ताचा तुटवडा – आरोग्य मंत्री राजेश टोपे
सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोना व लॉकडाऊनच्या काळात रक्तांची अधिक गरज भासत होती. त्यामुळे राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात राजेश टोपे हे पत्रकारांशी बोलत होते. रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं टोपेंनी आवाहन केले आहे.
मंत्री टोपे म्हणाले की, तरूण वर्ग हा मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री टोपे यांनी दिली.





