Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 16 तारखेला पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांत कमी प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही, तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज नाही. त्यानंतर 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच 18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. मग 19 तारखेला काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

दरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून हळूहळू उष्ण वारे, बाष्प येण्यास सुरुवात झाली आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याची तीव्रता वाढून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक असेल. तसेच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button