‘मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवतात, आणि ज्यांचा गुन्हाच नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतायत – शरद पवार
मुंबई | महाईन्यूज |
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. गुन्हे लपवल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री महाशय स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नोंद नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय,” “पण गुन्हेगारांना कसलीच फिकीर नाही. इथे सत्तेचा गैरवापर होतोय,” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत शपथपत्र सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली नव्हती. या प्रकरणात अॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्यास मंजुरी दिली. तर शिखर बॅंक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावरही ईडीने गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात पवार यांचे नाव कसे आले, यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या. भाजपाकडून राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला होता. यावर सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही पवार यांची बाजू घेतली होती. तसेच अजित पवार यांनीही राजीनामा दिला होता.
या दोन्ही प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती सादर करणे गरजेचे असते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्रीच स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, पण गुन्हेगारांना कसलीच फिकीर नाही. इथे सत्तेचा गैरवापर होतोय,” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, “राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक गुन्हे हे स्त्रियांवरील अत्याचारांचे आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या आई-बहिणींच्या अब्रूची काळजी नाही, त्यांच्या हाती सत्ता देणं चुकीचं ठरेल,” असं पवार म्हणाले.