मुख्यमंत्र्यांना राज्यातील महिलांकडून २१ लाख राख्या
![Devendra Fadnavis's sensational claim that a person related to the son of a senior NCP leader was also released!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Devendra-Fadanvis-2.jpg)
सर्वसामान्यांना पक्षाशी जोडण्यासाठी नानाविध तंत्रांचा अवलंब करत असलेल्या भाजपने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देण्याचा उपक्रम भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे आखण्यात आला आहे. २१ लाख महिलांच्या मनात भाजप-मुख्यमंत्र्यांविषयी बंधुभाव निर्माण करण्याची मोहीम या उपक्रमाद्वारे हाती घेण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विविध विकास योजनांच्या लाभार्थी महिलांशी या मोहिमेतून संपर्क साधण्यात येईल. या महिलांकडून मुख्यमंत्र्यांसाठी राख्या स्वीकारण्यात येतील.
भाजपाचे कार्यकर्ते महिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांचे पत्र देतील व त्यांना राखीसोबत मुख्यमंत्र्यांना लेखी संदेश देण्याची विनंती करतील, अशी माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.