मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील घटनेच्या चौकशीचे आदेश
भंडारा – भंडाऱ्यात आज मध्यरात्री देश हादरवणारी घटना घडली. सर्वजण साखरझोपेत असताना भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला भीषण आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून धुरामुळे गुदमरुन बाळांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वाचा :-भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयात आग, १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटमधील भीषण आगीत झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांशीदेखील चर्चा केली असून त्यांनाही तपासाचे निर्देश दिले आहेत.





