मुंबईत चार कोटी जप्त
![12 per cent pay hike for sugar workers in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/money-2000.jpg)
- काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज
विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने कंबर कसली असून विविध यंत्रणांच्या मदतीने राज्यभरात नजर ठेवली जात आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यापासून मुंबईतून ४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यभरात ६०३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंत्रणा प्राप्तिकर विभागाने सज्ज केली आहे. त्यामध्ये मुंबईत २१६, पुण्यात २५९, नागपूरमध्ये १२८ जणांना नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर पैशांचे अवैधरीत्या ने-आण होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच विमानतळांवर नजर ठेवली जात आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाचे महासंचालक (इव्हेंस्टिगेशन) नितीन गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्याचे निवडणूक नोडल अधिकारी आनंद कुमार उपस्थित होते.
निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यापासून मुंबईतून ४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत पैशांचा वापर करून मतदारांना प्रभावित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. पैशांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याबरोबरच प्राप्तिकर विभागाने जनजागृतीवरही भर दिला आहे. रेडिओ, समाजमाध्यमे, बस आणि माध्यमांतील जाहिराती यांद्वारे जनजागृती केली जात असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनात येताच त्याची तक्रार संबंधित यंत्रणेला देण्याचे आवाहन केले जात आहे.