माढा मतदार संघातून असा देणार उमेदवार , अजित पवार यांचं सूचक विधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/ajit-pawar-1.jpg)
पुणे – राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारीबाबत सूचक विधान केलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यानंतर आता माढा मतदार संघात कोणाला राष्ट्रवादीची उमेदवार मिळणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी माढा मतदार संघात तरूण उमेदवार देणार असल्याचं भाष्य केलं आहे.
पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने माढ्यातून विजयसिंह यांना तुम्ही लढा असं सांगितलं होतं. पण त्यांनी दुसरंच नाव दिलं. त्या नावाला माळशिरस वगळता माण-खटाव, फलटण सगळीकडून विरोध होता. नंतर त्यांनी फोनच बंद करून ठेवला होता. आता आम्ही माढ्यामध्ये नवीन तरुण उमेदवार देणार आहोत,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर माढ्यातून राष्ट्रवादी नक्की कुणाला तिकीट देणार, याबाबत अंदाज बांधण्यात येत आहेत. सध्या तरी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे.
तो तरुण उमेदवार कोण?
रणजितसिंह मोहिते-पाटील हे माढ्यातून भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. रणजितसिंह पाटील यांच्या विरोधात तेवढ्याच ताकदीचा आणि तरुण उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.