भुजबळ शेजारील कोठडी रिकामी ; अजित पवारांना इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/chandrakantpatil-ajitpawar.jpg)
मुंबई :- ‘शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत’ अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘छगन भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत’ असा थेट इशाराही पाटील यांनी आज दिला.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या महामेळाव्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी नेते, आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या महामेळाव्यामध्ये पाटील यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप-शिवसेना युतीमध्ये वाद धुमसत असला, तरीही अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे शिवसेनेची बाजू घेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची बाजू घेत पाटील म्हणाले, “शिवसेनेला गांडुळ म्हणणारे राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लाबोल यात्रा काढणाऱ्यांनी आधी स्वत:चा गल्ला भरला आहे. आता भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.