भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलाच्या हालचाली… पंकजा मुंडे, महाजन यांची नावे चर्चेत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/collagemahajan.jpg)
मुंबई : रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने आता त्यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण या बाबत चर्चा आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांची नावे चर्चेत आहेत.
राज्यात चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप ही निवडणूक लढणार असून पक्षसंघटनेची ताकद त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी करू शकेल आणि मुख्यमंत्र्यांशी समन्वय राखून काम करेल, अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाईल, असे म्हटले जाते. दानवे केंद्रात मंत्री झाल्याने आणि एक व्यक्ती एक पद हा भाजपमध्ये नियम असल्याने प्रदेश भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जाते. त्या दृष्टीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत.
२०१४ मध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने रिक्त प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले बहुतेक नेते फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री झाले होते आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास फारसे कोणी इच्छुक नव्हते. आता विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आहे. केंद्रात भाजपची सत्ताही आलेली असून भाजप-शिवसेना युती होणार असल्याने विधानसभेत विजयाबाबतचा आत्मविश्वास वाढला आहे. अशावेळी प्रदेशाध्यक्षपद मिळावे यासाठी भाजपचे बरेच नेते इच्छुक आहेत. दानवे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहराच दिला जाईल का या बाबत उत्सुकता आहे.