भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद – औरंगाबादमधील भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते आहे. बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखाना जवळपास अनेक वर्षांपासून बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जापोटी हा कारखाना जप्तदेखील केलेला आहे. संबंधित बँकेने हा कारखाना विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन कारवाईत गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून ९ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. न्यायालयाने ही रक्कम परत केली आहे व ती आतापर्यंत व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे या ठिकाणी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी डीआरटी न्यायालयाकडे पैसे जमा केले होते. त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून न्यायालयाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असे म्हटले. यामुळे या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.