पोलिओ डोस देताना झाकण गेले बाळाच्या पोटात; पंढरपुरातील धक्कादायक प्रकार
![The lid went into the baby's stomach during the polio dose; Shocking type in Pandharpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pandarpur-polio.jpg)
पंढरपूर – यवतमाळमध्ये पोलिओ लस देण्याऐवजी सॅनिटायझर देण्यात आल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पंढरपूरमधूनही धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान बाळाला पोलिओ लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही (नोझल) बाळाच्या पोटात गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
वाचा :-यवतमाळमध्ये मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोघे निलंबित
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. पोलिओचे ड्रॉप पाजणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा उघडकीस आला. संबंधित एका वर्षाच्या बाळाची आई रविवारी त्याला घेऊन पोलिओ बूथवर ड्रॉप देण्यासाठी आली होती. यावेळी लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही बाळाच्या पोटात गेले. त्यानंतर तातडीने बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांनी दिला. तसेच झालेल्या या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथेसुद्धा असाच धक्कादायक प्रकार घडला होता. पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. 1 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस देण्यात आली होती. अचानक मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.