पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या बहुतांश बोटी किनाऱ्यावर परतल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/new-palghar-1.jpg)
समुद्रात मासेमारी करत असलेल्या शंभर बोटींपैकी बहुतांश बोटी जिल्ह्यातील विविध मासेमारी बंदरावर परतल्या असून, वसई तालुक्यातील १३ बोटींची परतण्याची अजूनही प्रतिक्षा आहे. मासेमारी बंदीचा कालावधी सुरु झाल्यानंतर मासेमारी सुरू ठेवणाऱ्या मच्छीमारांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करण्याची मागणी काही मच्छीमारांनी केलेली आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदीचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता व त्या अनुषंगाने ३१ मे पर्यंत परवाने दिले गेले होते. तरीदेखील सुमारे शंभर ते दीडशे बोटी १ जून नंतर देखील समुद्रात विनापरवाना मासेमारी करीत असल्याचे आढळून आले होते. चक्रीवादळाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बोटींनी तातडीने माघारी फिरावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी रविवारी दिल्यानंतर देखील १०० बोटी सोमवार सायंकाळीपर्यंत समुद्रात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती.
या शंभर बोटींपैकी अधिक तर बोटी काल रात्री व आज सकाळी बंदरामध्ये परतल्या असून वसई तालुक्यातील तेरा बोटी परतीच्या मार्गावर असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली. या बोटी आज रात्री किंवा उद्या पहाटे बंदरामध्ये दाखल होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भरकटलेल्या बोटींचा शोध घेण्याचे काम तटरक्षक दलाकडून केले जात असून, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने जिल्ह्याच्या समुद्री भागात पाहणी दौरा केल्याची माहिती पुढे आली आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मच्छिमारांच्या विरोधात मत्स्यव्यसाय विभागाने कारवाई करण्याची मागणी मच्छीमार समुदायाकडून करून करण्यात येत आहे.