परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/munde-rohit-1.jpg)
- आमदार धनंजय मुंडे, रोहित पवार यांची मागणी
पुणे : मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने हजारो उमेदवारांना एकच परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात मुंडे यांनी राज्यपालांना, तर पवार यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) अभियांत्रिकी सेवा परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांवर रविवारी (२४ नोव्हेंबर) होणार आहे. तर सोमवारी (२५ नोव्हेंबर) बृहन्मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठी परीक्षा मुंबईत होणार आहे. तसेच २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठी परीक्षा ही प्रत्येक जिल्ह्य़ात होणार आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांना लागोपाठ परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यातही मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कोणत्यातरी एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.