पंढरपुरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
![NCP leader speaks about Mumbai Municipal Corporation election says...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/ajit-pawar1-1.jpg)
मुंबई – पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी दुपारी कोसळली. या घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल घेत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पंढरपुरात पावसाचा धुमाकूळ सुरू असून काल दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. मंगेश गोपाळ अभंगराव (वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70) आणि दोन वारकरी महिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
दरम्यान, घाटाच्या भिंतीच्या आडोशाला आठ जण बसले होते. भिंत कोसळल्यानंतर सर्वजण ढिगाऱ्याखाली दबले. यामध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश होता. त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले.
तसेच राज्यात कोकण, पश्चिम, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत, असे निर्देश दिले आहेत.