धक्कादायक! 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर 100 चटके, अंधश्रद्धेचा कहर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Amravati-child.jpg)
अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेतून तांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई वडिलांनी आजारी बाळाच्या पोटावर गरम विळ्याने तब्बल 100 चटके दिले आहेत. हा धक्कादायक प्रकार बोरदा गावात घडला आहे. 8 महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर इतके चटके खुद्द आई-बापाने एका तांत्रिकाच्या सल्ल्याने दिल्याने संताप व्यक्त होत आहे.
जरी हा प्रकार अज्ञानातून घडला असला तरी सर्वात आधी भोंदू तांत्रिकाला अटक करुन, त्याला जामीन दिला नसला पाहिजे, अशी मागणी अंनिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात बोरदा हे अतिदुर्गम भागातील गाव आहे. या गावातील एका दाम्पत्याचं 8 महिन्यांचं बाळ आजारी होतं. मात्र त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांनी तांत्रिक-मांत्रिकाला दाखवलं असता त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरुन या आई-वडिलाने 8 महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर विळ्याच्या टोकाचे 100 गरम चटके दिले आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या बालकाला आठ दिवसापासून खोकला आणि पोट फुगत असल्याचा त्रास होता. त्याला दवाखान्यात न नेता भगत भुमका या तांत्रिकाकडे नेले. त्याच्या सांगण्यावरुन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले.
याप्रकारावरुन मेळघाटातील अंधश्रद्धेचं भीषण वास्तव समोर आलं आहे. अशा पोटफुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. या बालकाला ताप होता, त्यामुळे हा गंभीर प्रकार अंधश्रद्धेतून घडला आहे. या बाळाला ग्रामीण रुग्णालयात चुरनी येथे दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी तांत्रिकासह एकाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.