टपाल कार्यालयांमध्ये पोस्टकार्ड्सचा तुटवडा

संगणक आणि मोबाइलच्या युगातही मागणी असलेल्या पोस्टकार्ड्सचा टपाल कार्यालयांमध्येच तुटवडा निर्माण झाला आहे. छपाई कमी प्रमाणात होऊ लागल्यामुळे टपाल कार्यालयातूनच पोस्टकार्ड गायब झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील टपाल कार्यालयांमध्ये पोस्टकार्डचा अखेरचा पुरवठा झाला होता.
टपाल खात्याची तारसेवा इतिहासजमा झाल्यानंतर आता पोस्टकार्डची वाटचालही त्याच दिशेने होऊ लागली आहे. अवघ्या पन्नास पैशांत ख्यालीखुशाली, माहिती, निरोप कळविणारे सहजसोपे माध्यम म्हणून पोस्टकार्डची ख्याती होती. ई-मेल, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा आधुनिक माध्यमांचा स्वीकार केल्यामुळे पोस्टकार्डसाठी नागरिकांकडून मागणी कमी होऊ लागली आहे. मागणी कमी झाल्यामुळे पोस्टकार्डची छपाई कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक टपाल कार्यालयांमध्ये सध्या पोस्टकार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती शहरातील पश्चिम विभागाच्या (सिटी पोस्ट) वरिष्ठ पोस्टमास्तर स्वाती दळवी यांनी दिली.
हैदराबाद येथे पोस्टकार्ड्सची तर, नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमध्ये टपाल तिकिटे आणि रेव्हेन्यू स्टॅम्पची छपाई केली जाते. नाशिक येथील सर्कल स्टॉक डेपो (सीएसडी) येथून राज्यभरातील टपाल कार्यालयांना पोस्टकार्ड्सचा पुरवठा केला जातो. संगणक आणि मोबाइलच्या जमान्यात पोस्टकार्ड लिहिण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. रजिस्टर आणि स्पीड पोस्ट यामुळे पोस्ट कार्ड खरेदी करण्याचे प्रमाण घटले. मागणी कमी झाल्यामुळे पोस्टकार्ड्सची मोजकीच छपाई होऊ लागली आहे.
शहरातील अनेक टपाल कार्यालयांमध्ये पोस्टकार्ड मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आम्ही गेल्या महिन्यामध्ये दोनदा पोस्टकार्ड्सची मागणी केली होती. मात्र, नाशिक येथील कार्यालयाकडून अद्याप पोस्टकार्ड्सचा पुरवठा झालेला नाही, याकडे स्वाती दळवी यांनी लक्ष वेधले. दोन महिन्यांपूर्वी (५ एप्रिल) पाच हजार रुपये किमतीच्या दहा हजार पोस्टकार्ड्सचा पुरवठा झाला होता. मात्र, ही पोस्टकार्ड लगेचच संपली, असेही त्यांनी सांगितले. मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षांत पश्चिम विभागाने वर्षभरात नाशिक येथील सर्कल स्टॉक डेपोकडे २ लाख ५ हजार पोस्टकार्डाची मागणी केली होती. या केंद्राकडून एक लाख ८२ हजार ५०० पोस्टकार्डाचा पुरवठा करण्यात आला होता.
संस्थांकडून मागणी
स्नेहमेळावा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा याची सूचना सभासदांना देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक न्यास आणि पतसंस्थांकडून पोस्टकार्ड्सना मोठी मागणी असते.





