कोळसा टंचाईमुळे चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/electricity.jpg)
- हजार मेगावॅट वीज निर्मिती ठप्प
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे केवळ अर्धा दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने ५०० मेगावॅटचे दोन संच तातडीने बंद केले आहेत. यामुळे हजार मेगावॅट वीज निर्मिती ठप्प झाली आहे. गेल्या महिन्यापासून चंद्रपूर केंद्राला अनियमित कोळसा पुरवठा होत आहे. चोवीस तासांत कोळसा पुरवठा झाला नाही तर इतरही संच टप्प्या टप्प्याने बंद करावे लागणार असून त्यामुळे तीव्र वीज टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पाश्र्वभूमीवर वीज केंद्राने कोळसा तात्काळ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चार दिवसांपूर्वी कोळसा नसल्यामुळे दोन संच ऑईलवर चालविले. त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. मात्र, हा पर्याय आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही. कोळशाची टंचाई बघता शुक्रवारी वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी ५०० मेगावॅटचा सात व आठव्या क्रमांकाचा संच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वीज उत्पादन आता १४१० मेगावॅटवर आले आहे.
अर्धा दिवस पुरेल एवढाच कोळसा
उन्हाळय़ात तीव्र पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या येथील महाऔष्णिक वीज केंद्राला सध्या कोळशाच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ५०० मेगावॅटचे पाच व २१० मेगावॅटचे दोन असे एकूण सात संच असलेल्या या केंद्राला चंद्रपूर, वणी, घुग्घुस, बल्लारपूर व माजरी या ठिकाणाहून कोळसा पुरवठा होतो. गेल्या महिन्यापासून वीज केंद्राला अनियमित कोळसा पुरवठा सुरू आहे. त्यातच गेल्या सात दिवसांपासून तर वीज केंद्राला कोळसा मिळालेलाच नाही. वीज केंद्रातील सात संचासाठी दररोज ५० हजार मेट्रीक टन कोळसा लागतो.