breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा सदस्यत्वाचा राजीनामा, 31 जुलैला भाजप प्रवेश

मुंबई : नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज (29 जुलै) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यानंतर बुधवारी 31 जुलैला कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. गेल्या साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडविण्यात न्याय दिला नाही. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची भावना कालिदास कोळंबकरांनी याआधीच व्यक्त केली होती.

“माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या अटी मान्य केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आधीच काँग्रेसला फटका बसत आहे. त्यातच आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, उद्या मंगळवारी (30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यानंतर येत्या बुधवारी म्हणजे 31 जुलैला कोळंबकर भाजपात प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत कालिदास कोळंबकर ?

  • कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
  • सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
  • नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button