काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन
![Senior Congress leader Vilaskaka Patil Undalkar passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/विलासकाका-पाटील-उंडाळकर.jpg)
सातारा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन झाले आहे. साताऱ्यात वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील एका महिन्यापासून ते साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत होते. अखेर आज पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कराडवर शोककला पसरली आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील उंडाळे गावी आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाचा:-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,42,136 वर
विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात झाले. तर माध्यमिक शिक्षण त्यांनी कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केले. यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. ते काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले नेते होते. कराडचा बालेकिल्ला त्यांनी कायम राखला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्त्व केले. याच काळात ते सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा राहिले होते. विलासकाकांनी कराडमधून तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा करिष्मा केला होता.