आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/maxresdefault-1.jpg)
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.
येत्या 19 मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मनसे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसयांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला.
मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपावर तुफानी टीकास्त्र सोडले होते. तसेच, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत आचारसंहिता लागल्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट करु असे सांगितले होते. त्यामुळे येत्या 19 मार्चला राज ठाकरे मनसेची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.