अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत
मुंबई : “अजित पवार यांची देहबोली सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला,” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत अजित पवारांसह भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन केली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेतील, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
आज (23 नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे काही नेते तसंच अजित पवार राजभवनावर पोहोचले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.





