breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांचे  ब्रँडिंग अन् मातब्बर लांडे, वाबळेंना ‘झटका’

–           इंद्रायणीनगरसह शहरात वाढदिनी युवक राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

–           राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पटलावर ‘‘अल्पसंख्याक समाजाचा प्रभावी चेहरा’’ म्हणून माजी महापौर आझम पानसरे यांची ओळख आहे. शहरातील सर्वसमाजाचा सर्वमान्य नेता म्हणून त्यांची आपली कारकिर्द गाजवली. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे नवे नेतृत्व विकसित होत आहे. मात्र, त्यामुळे मातब्बर राजकारणी माजी नगरसेवक विक्रांत लांडे आणि संजय वाबळे यांचा ‘झटका’ बसला आहे.

युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अनेक बलाढ्य युवा नेत्यांची नावे चर्चेत असताना इम्रान शेख यांनी बाजी मारली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शेख यांना शहराच्या नवीन संघटनात्मक बदलामध्ये मोठे पद मिळाले. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या विश्वासातील कार्यकर्ता असलेले इम्रान शेख यांनी शहरातील ज्येष्ठ आणि नवोदितांशी जुळवून घेतले आहे.

विशेष म्हणजे, विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि निवडणूक प्रभारी योगेश बहल यांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये इम्रान शेख आहेत. पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभागनिहाय युवक कार्यकारिणीची मोर्चेबांधणी करण्यात आली असून, अल्पावधीत शहर पातळीवर प्रभाव निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले आहे. विविध आंदोलने, मोर्चे आणि संघटनात्मक पातळीवरील सक्षम नियोजनामुळे त्यांनी प्रदेश पातळीवरील नेतृत्वाचे लक्षसुद्धा वेधले आहे.

दरम्यान, इम्रान शेख आणि समर्थकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून (दि.१० ऑक्टोबर) इंद्रायणीनगरसह पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी जोरदार ब्रँडिंग केले. इंद्रायणीनगर येथील सेक्टर ७ येथे युनूसभाई शेख स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा… हा दिमाखदार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला लक्षवेधी गर्दी जमवून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहरातील बहुतांश नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्यास समाजाचा चेहरा असतानाही बहुजन युवकांचे मोठे संघटन जोडण्यात यशस्वी होताना दिसत आहेत, ही बाब त्यांच्या राजकीय वाटचालीत सकारात्मक आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

आगामी निवडणुकीत काय होईल?

इंद्रायणीनगर आणि परिसरात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे सूपत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे आणि माजी स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे हे तीव्र इच्छुक मानले जातात. २०१७ मध्ये झालेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत वाबळे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे वाबळे यांनी ‘बारामती कनेक्शन’ आणि स्थानिक भाजपाच्या नेत्यांच्या सहकार्याने स्वीकृत नगरसदस्यपदी संधी मिळवली होती. त्यामुळे वाबळे यांना पक्षाकडून तीनदा संधी मिळाली आहे. विक्रांत लांडे यांचा गेल्या ५ वर्षांतील ‘परफॉर्मन्स’ पाहता विक्रांत यांना राजकीय चढाओढीत स्वारस्य नसल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून संधी मिळाल्यास या भागातील राजकीय लढतींचे चित्र बदललेले पहायला मिळेल. विशेष म्हणजे, इम्रान शेख याच भागात वास्तव्यास आहेत. या भागात अल्पसंख्याक समाजाचे मतदान निर्णायक आहे.  त्यामुळे  अजित गव्हाणे आणि योगेश बहल यांच्या सहकार्याने ‘होम पिचवर’ इम्रान शेख निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. कारण, त्यांनी आतापासूनच ब्रँडिंग सुरू केले आहे. यासह केवळ राखीव जागेवरच नाही, तर खुल्या प्रवर्गातूनही इम्रान शेख निशीब आजमावून शकतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button