breaking-newsराष्ट्रिय

Lok sabha 2019 : भाजपाची सोशल मीडिया वॉर रुम लवकरच होणार कार्यरत

लोकसभा निवडणुकीच्या पारंपारिक प्रचाराला सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील प्रचारासाठीही राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भाजपाने गेल्या वेळेप्रमाणे यंदाही सोशल मीडियावरील प्रचारासाठी नवी रणनीती आखली आहे. यासाठी सोशल मीडियातून होणाऱ्या आरोपांवर थेट उत्तर देण्यासाठी भाजपाकडून सोशल मीडियातील वॉर रुम निर्मितीचे काम सुरु असून पंत मार्गावरील दिल्लीच्या प्रदेश मुख्यालयात ती तयार होत आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारींसह पक्षाच्या इतर नेत्यांनी सोमवारी याचे भुमीपुजनही केले. त्यानंतर आता एका आठवड्यामध्ये भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी ही वॉर रुम उपलब्ध होणार आहे. ही वॉर रुम वातानुकूलीत असून यामध्ये एक मुख्य कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात येत आहे. यामध्ये एकाच वेळी ४०० जण बसू शकतील. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या नेत्यांसाठी स्वतंत्र कक्षही येथे बनवण्यात येणार आहेत. याचा वापर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि नगरसेवकही निवडणुकांच्या दरम्यान करु शकतील. दरम्यान, निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच सोशल मीडियासाठी कडक निर्देश जारी केले आहेत. त्याचे उल्लंघन होता कामा नये यासाठी भाजपाने हा सर्व खटाटोप केला आहे.

या सोशल मीडियाच्या वॉर रुमद्वारे विरोधी पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देणे तसेच केंद्रीय धोरणांद्वारे देशाला मिळालेल्या लाभांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर प्रचारासाठी भाजपा सर्वाधिक अतूर

सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरातींना परवानगीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात पुढे आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर संबंधीत समितीकडे २४ मार्चपर्यंत भाजपाकडून ३३ अर्ज आले आहेत. तर ६ अर्जांसह आम आदमी पार्टी दुसऱ्या स्थानी आहे. तर ४ अर्जांसह काँग्रेस सर्वांत मागे आहे. आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी आपविरोधात आहेत. त्यानंतर भाजपाविरोधात तक्रारी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button