breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: देवमाणूस… ‘या’ ८१ वर्षीय शीख व्यक्तीने महाराष्ट्रात येणाऱ्या-जाणाऱ्या २० लाख लोकांना दिलं जेवण

मार्च महिन्यामध्ये २५ तारखेला लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून अनेक स्थलांतरित मजुरांनी पायीच आपल्या राज्यात परत जाण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक भागांमधील लाखो मजूर पायीच आपल्या गावाकडे रवाना झाले. आपल्या गावी पायी चालत निघालेल्या अशा मजुरांना अन्न देण्याचं काम यवतमाळ जिल्ह्यातील करंजी या गावात दोन महिन्यांपासून एक वयस्कर शीख इसम करत आहे. ८१ वर्षांच्या या व्यक्तीने मागील दोन महिन्यांमध्ये या मार्गावरुन पायी चालत निघालेल्या २० लाख मजुरांना खाऊ घातलं आहे.

बाबा कर्नाल सिंग खैरा असं या व्यक्तीचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील करंजी हे गाव  नागपूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर पांढरकवडा नजीक आहे. बाबा कर्नाल यांची एकमेव छोटेखानी टपरी वजा खानावळ आहे. पत्र्याची शेड आणि प्लास्टिकच्या ताडपत्रीपासून बनवण्यात आलेल्या या शेडमध्येच बाबा कर्नाल सिंग राहतात. “हा दुर्गम आणि आदिवासी भाग आहे. येथून १५० किमी मागच्या बाजूला आणि पुढे ३०० किमीपर्यंत एकही ढाबा किंवा हॉटेल नाही. त्यामुळेच अनेकजण आमच्या गुरु का लंगरमध्ये थांबतात आणि २४ तास सुरु असणाऱ्या अन्न सेवेचा लाभ घेतात,” असं बाबा कर्नाल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं.

मागील अनेक वर्षांपासून ही सेवा सुरु असली तरी लॉकडाउन सुरु झाल्यापासून येथे येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये स्थलांतरित मजुरांबरोबरच ट्रक चालक आणि गावकऱ्यांचाही समावेश आहे. “रोज शेकडोच्या संख्येने लोकं या अन्नसेवेचा लाभ घेण्यासाठी येतात आणि त्यामुळे आमच्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवणं सतत सुरुच असतं. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्वांचे हसतमुखाने स्वागत करतो. मी १७ सेवकांची एक टीम आहे. त्यामुळे ११ स्वयंपाकी आहेत. हे लोकं शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे आमचे किचन कधीच बंद नसतं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही किचनमधील काम २४ तास सुरु ठेवतो,” असं बाबा कर्नाल सांगतात.

बाबा कर्नाल हे स्वत: येथे काम करत असले तरी सर्व आर्थिक मदत त्यांना त्यांचा भाऊ म्हणजेच बाबा गुरुबक्श सिंग खैरा करतात. गुरुबक्श हे अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. गुरुबक्श हे स्वत:च्या खिशातील निधी देण्याबरोबर अमेरिकेमधील शीख समुदायाकडून या अन्नदानासाठी पैसा उभा करतात.

मागील १० आठवड्यांमध्ये म्हणजेच दोन महिन्यांमध्ये या लंगरमधून १५ लाख जणांना मोफत जेवण देण्यात आलं आहे. तर पाच लाख खाण्याची पाकिटं येथून जाणारे स्थलांतरित मजुर घेऊन गेले आहेत. या लंगरमध्ये सकाळी चहा आणि बिस्कीट किंवा पोळी दिली जाते. त्यानंतर दुपारच्या जेवणाला साधा भात आणि तुरडाळ असे जेवण असते. अन्नाबरोबरच या ठिकाणी येणाऱ्यांना अंघोळीसाठी साबण आणि बोअरवेलचे पाणीही दिलं जातं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button