breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Lockdown : केंद्र शासनाच्या आदेशाची महाराष्ट्राने त्वरित अंमलबजावणी करावी – यशवंत भोसले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने आदेश काढला असून जे कामगार विविध राज्यांमध्ये अडकले आहेत त्या कामगारांना त्यांच्या मूळ घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या गृहमंत्रालयाच्या आदेशाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित अंमलबजावणी करावी व कामगार, मजूर, विद्यार्थी व यात्रेकरु यांना त्यांच्या घरी पोहोचवावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व राज्याचे कामगार नेते यशवंत भोसले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.

आज फेसबुक लाईव्ह वरून राज्यातील कामगारांच्या बरोबर आपले मनोगत व्यक्त करत असताना कामगार नेते भोसले म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन झाल्यामुळे लाखो कामगार विविध राज्यात अडकून पडले होते. या कष्टकरी, श्रमिक, मजूर कामगारांचे मोठ्या प्रमाणावर  हाल होऊ लागले होते. त्यामुळे आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून रस्त्यातच अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाऊ द्यावे अशी मागणी करत होतो. या संदर्भात ई-मेल, फेसबुक व फोन द्वारे आपण राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे.

या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून केंद्र शासनाने आता या कामगारांना आपापल्या घरी जाण्यास परवानगी दिली आहे.  उच्च अभ्यासक्रमासाठी विविध राज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांना तसेच यात्रेकरुंनाही कोरोनाच्या लॉकडावूनमध्ये अडकून पडावे लागले होत. त्यांनाही आपआपल्या मूळ घरी परतण्यास गृह मंत्रालयाच्या या आदेशामुळे संधी मिळाली आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली.

यशवंत भोसले म्हणाले की, लॉक डावून झाल्यानंतर परराज्यातून आलेले कामगार आपापल्या घरी जाण्यासाठी पायी निघाले होते. सातशे किलोमीटर उन्हातान्हात आपली चीलीपिली खांद्यावर घेऊन ते पायपीट करत होते. 40 डिग्री सेंटीग्रेड तापमानात चालल्यामुळे अनेक जणांचे हाल झाले आहे. असे हाल करण्यापेक्षा त्यांना आपल्या परिवारात जाऊ द्या. असे आपण वारंवार शासनास सांगत होतो. कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद पडले देशातील विविध राज्यात लाखो कामगार, मजूर अडकून पडले होते. या कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली होती. या कामगारांना त्यांचे वेतनही उद्योजकांनी दिले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली होती. अनेक ठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीत पंधरा-वीस कामगार अडकुन पडले होते. मात्र उपाशीपोटी शासन आदेशाचे ते पालन करत होते. त्यांना उपासमारीने मरण्याची वेळ आली असल्याने या कामगारांना वेतन द्या व आपापल्या घरी जाऊ द्या असे ई-मेल द्वारे, पत्रकार परिषद मार्फत आपण विनंती करत होतो. अशी माहिती यशवंत भोसले यांनी यावेळी दिली.

रस्त्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांना आपापल्या ठिकाणी जावे यासाठी आम्ही न्यायालयाचा दरवाजा ही ठोठावण्यास तयार झालो होतो. यासंदर्भात अ‍ॅड. प्रशांत शिरसागर अ‍ॅड. संजय माने व अ‍ॅड. विशाल कोळेकर यांच्याशी सल्लामसलत चालू होती. परंतु काल गृहमंत्रालयाने आदेश काढून आमची मागणी मान्य केली आहे. याबद्दल भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button